रवींद्र चव्हाणच्या विलासराव देशमुख वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया; अमित–रितेश–धीरज यांनी पलटवार
लातूर | प्रतिनिधी भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. चव्हाण यांच्या या विधानावर काँग्रेसचे नेते अमित देशमुख, अभिनेता रितेश देशमुख आणि युवक काँग्रेसचे नेते धीरज देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पलटवार केला आहे. लातूर येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्या राजकीय कार्यकाळावर टिप्पणी केली होती.भाजपचे कार्यकर्ते इतके उत्साही आहेत कि लोकांच्या मनातून विलासरावांची छवी पुसली जाईलअसे वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केले.या वक्तव्यामुळे देशमुख कुटुंबीयांसह काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अमित देशमुख यांनी विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. अशा प्रकारची विधाने चुकीची असून ती राजकीय द्वेषातून केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अभिनेता रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वडील विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या कार्याची आठवण करून दिली. त्याचबरोबर धीरज देशमुख यांनीही चव्हाण यांच्या विधानावर टीका करत संयम बाळगण्याचा सल्ला दिला. वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी आपल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्या शब्दांमुळे कोणी दुखावले गेले असेल, तर त्याबद्दल खेद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण घटनेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा विधानांमुळे राजकीय तणाव वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.रवींद्र चव्हाण यांच्या विधानावर राजकीय वाद; देशमुख कुटुंबाकडून जोरदार प्रतिवाद